राज्यात गारठा कायम, मात्र तापमानात अंशत: वाढ ; या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी । सध्या राज्यात हवामान कोरडे झाले असून, तापमानात अंशत : वाढ झाली आहे. तापमानात वाढ झाली असली तरी वातावरणात गारठा अद्याप कायम आहे. खान्देश , विदर्भ , मध्य महाराष्ट्रात आगामी दोन दिवस दाट धुके, तर 21 आणि 22 जानेवारीला खान्देशासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यात सोमवारी गोंदिया जिल्ह्यात 11 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. आगामी काही दिवस खान्देशमध्ये थंडी काहीशी अधिक, तर कोकणसह दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा , सांगली , कोल्हापूर , सोलापूरमध्ये थंडी कमी जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात हळूहळू ढगाळ वातावरण निवळण्याचीही अपेक्षा आहे. रब्बी पिकासाठी आठवडाभर वातावरण काहीसे पूरक असेल. खान्देशातील धडगाव, अक्कलकुवा, अकराणी, शहादा, शिरपूर, चोपडा, रावेर, यावल तसेच विदर्भातील जामोद , धामणी , चिखलदरा, वरूडपर्यंत व सभोवतालच्या परिसरात पुढील दोन दिवस दाट धुके असणार आहे. तर 21 आणि 22 जानेवारीला तुरळक ठिकाणी किंचितशी गारपीटही होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक भागात जानेवारीचा अर्धा महिना उलटून गेला तरी थंडीचा कडाका कायम आहे. दिल्लीत थंडीच्या लाटेसह धुक्याचा परिणाम दिसून येत असल्याची स्थिती आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस तरी यापासून दिलासा मिळणार नाही. दिल्लीशिवाय राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पुढील दोन दिवस थंडीच्या लाटेसह धुके पडणार आहे.

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्येही बर्फवृष्टी झाली आहे. राज्याच्या इतरही भागात बर्फवृष्टी होत आहे. कुठे बर्फवृष्टीने जनजीवनाला ब्रेक लावला आहे, तर कुठे पर्यटक त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. श्रीनगरमध्ये बर्फवृष्टीने कहर केला आहे. येथील किमान तापमान एक अंशाच्या आसपास आहे. जोराच्या थंडीमुळे लोकांना त्यांच्या घरातच राहावे लागत आहे. कुपवाडामध्ये सतत मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या भागात गेल्या काही तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे लोकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. लोक मजबुरीने घराबाहेर पडत आहेत, पण त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामानातील बदलामुळे तापमानातही घट झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *