महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी । मागील काही दिवसांत मराठवाड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने जगणे मुश्कील केले. परंतु आता विविध ठिकाणी गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. साेमवारी बीड, लातूर, परभणी आदी ठिकाणी दूरवर धुक्याची चादर पसरली हाेती. बीड शहरामधून जाणाऱ्या धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी दाट धुके पसरल्याने रस्त्यावरील वाहनेही दिसत नव्हती. पहाटेपासूनचे धुक्याचे वातावरण सकाळी १०.३० वाजेपर्यंत कायम होते. दुपारी एक वाजेच्या सुमारास सूर्यदर्शन झाले. दरम्यान, बीडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने म्हणाले की, पहाटेच्या वेळी धुके पडलेले असल्यास ते किती दाट आहे, याची चालकाने पडताळणी करावी व नंतरच प्रवास करावा.
लातूर, परभणी शहरातही अशीच काहीशी स्थिती होती. परभणी शहर परिसरात सर्वदूर दाट धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हे धुके एवढे दाट होते की साधारणपणे २० ते २५ फुटांपलीकडे फारसे स्पष्टपणे काही दिसत नव्हते.
पावसामुळे पिकांवर परिणाम
रब्बी पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव झालेला अनेक भागांत पाहायला मिळत आहे. दरम्यान, परभणीत सोमवारी सकाळच्या सुमारास पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले असून धुक्याचे प्रमाण वाढले, तर रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांवर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढतो की काय, अशी चिंता व्यक्त करत आहेत.
परभणी @ 11.20
सोमवारी परभणीचे तापमान ११.२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंडगार वारे वाहत असून यंदा बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे.