महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी । शेतकरी (Farmer) व बैलगाडा प्रेमींच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असताना, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्याती स्थगित करण्यात आली. आणि सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मात्र या नंतर पुन्हा एकदा बैलगाडा (Bullock cart) चाहत्यांच्या व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी मावळ मधील बैलप्रेमी संतोष जांभुलकर यांनी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. काय आहे ही अनोखी स्पर्धा जाणून घेऊया
मावळ तालुक्यात बैलगाडा प्रेमी हे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी मावळ मधील संतोष जांभूळकर यांनी थेट बैलांची रॅम्प वॉक स्पर्धाच आयोजित केली आहे. आणि ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येत आहे. बैलगाडा प्रेमींनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तर ही स्पर्धा अशी आहे की यात बैलजोडीचा चालतानाचा एक मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण कुटुंबासह काढायचा आहे. त्यानंतर बैलांचा गोठा कशा पद्धतीने बनवला आहे. त्यात बैलांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची कशी सोय करण्यात आली आहे हे देखील या व्हिडिओ द्वारे दाखवायचे आहे. या स्पर्धेत शेकडो बैलगाडा प्रेमींनी सहभाग घेतला आहे.
जी बैलजोडी अथवा बैलांची सजावट आकर्षक असेल अशा बैलांना किंवा बैलजोडीला विजेता घोषित करण्यात येणार आहे. यासाठी स्पर्धेत स्वतःचा बैल असणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे बैल हा सजवलेला, स्वच्छ असणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे. विजेत्या बैलांची निवड ही त्याची चाल, शिंग, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर निवडलं जाणार आहे.
मावळ तालुक्यात प्रथमच बैलांची रॅम्प वॉक स्पर्धा भरविल्यामुळे बैलगाडा प्रेमीं मध्ये एक वेगळंच नवचैतन्य आल्याचे पहायला मिळत आहे. त्यासाठी आपलाच बैल विजेता कसा होईल यासाठी मावळातील बैलगाडा प्रेमींनी कंम्बर कसली आहे. आता यात नेमका कोणता बैल प्रथम क्रमांक पटकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.