महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ; यंदा शैक्षणिक वर्षे च्या प्रारंभीच जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. आता कोरोनाच्या धास्तीमुळे जाहीर केलेल्या सुटीमुळे या शैक्षणिक वर्षांचा समारोप होतो आहे.कोरोनाला अटकाव करण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व शाळा दि. 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे सुटीपूर्वीच शाळा ओस पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील आश्रमशाळा चोवीस तास गजबजलेल्या असतात. ते निवासी विद्यार्थीही त्यांच्या गावी जाऊ लागले आहेत. त्यामुळे रात्रंदिवस गजबजलेला आश्रमशाळेचा परिसरही सुटीपूर्वीच ओस पडू लागला आहे. दरवर्षी पंधरा एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपतात. त्यानंतर एक ते पाच मेपर्यंत शाळेत शिक्षक शालेय कामकाजासाठी उपस्थित असतात. परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवतात. त्यामुळे शाळेचा परिसर सुनासुना होतो.
यंदा १ ते ८ वी परीक्षा रद्द झाल्यामुळे दरवर्षी पंधरा एप्रिलनंतर दिसणारे हे चित्र यंदा एक महिना आधी पंधरा मार्चनंतरच दिसू लागले आहे.