महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । निवडणुका आल्या की, आपण काय करणार हे उमेदवार सांगत फिरतात. पण युवा मतदारांना काय पाहिजे, याचा कोणीच विचार करत नाही. मये मतदारसंघातील युवकांच्या प्रतिक्रिया लोकमतने जाणून घेतल्या. तेव्हा या युवकांच्या वीज, पाणी, नेटवर्क अशा किमान अपेक्षा आहेत. त्याचबरोबर स्थानिक जमिनींचा महत्त्वाचा प्रश्न लोकप्रतिनिधींनी सोडवावा, अशी मागणी त्यांची आहे. आजवर या मागण्यांकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे.
मये मतदारसंघात अद्याप अनेकांना जमिनींचा हक्क मिळाला नाही. त्यांना केवळ आश्वासनेच मिळाली. जमिनींचा हक्क देण्यात यावा, असे युवक म्हणतात. तसेच काही गावांत अजून वीज, पाणी आणि नेटवर्क यांसारख्या समस्या आहेत. या समस्या आतातरी सोडवाव्यात. आमचा आमदार आम्हाला गावात उपलब्ध व्हावा. जेणेकरून आम्ही आमचे प्रश्न त्याच्याकडे मांडू शकू, असेही काही युवकांनी सांगितले.
बहुतांश युवकांनी रोजगार निर्मितीवर भर दिला आहे. तसेच जे स्वतः व्यवसाय करत आहेत, त्यांना पाठबळ द्यावे. युवकांना सक्षम करावे, लाचार करू नये, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात असलेल्या युवकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे युवकांचे म्हणणे आहे.
मये मतदारसंघाला प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेला आहे. या मंदिरांचे संवर्धन करण्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. येथील सप्तकोटेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. वायंगिणी येथील खेतोबाचे मंदिर, शिरगावचे लई-राई मंदिर, महामाया मंदिर अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत. या मंदिरांबाबत विविध आख्यायिका आहेत. येथे ‘मये’ दर्शन यांसारखा उपक्रम राबवून एखादा जाणकार गाईड नेमून पर्यटनदृष्ट्या विचार केला जाऊ शकतो, असे युवकांचे म्हणणे आहे.