महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ जानेवारी । येथील महात्मा फुले बाजारात आज कांद्याच्या दहा हजार पिशव्यांची मोठी आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला २७ रुपये भाव मिळाला. अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी सांगितली. येथील महात्मा फुले बाजारात नवीन काढणी केलेल्या, कांद्याची मोठी आवक होत आहे. जुन्या कांद्याची आवक संपली आहे. स्थानिक परिसरातील नव्या काढणी केलेल्या कांद्याची आवक सध्या सुरू आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत आहे, तरी भाव वाढत आहेत. यावर्षी ढगाळ हवामानाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. कांद्याची काढणी सुरू झाल्याने आवक वाढणार आहे. कांद्याचे भाव वाढले तरी कांद्याचा उत्पादन खर्च वसूल होत नाही.