महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या ४० हजारांच्या घरात आहे. पण यात मंगळवारी काहीशी घट दिसून आली. राज्यात मंगळवारी दिवसभरात ३९,२०७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर राज्यात मंगळवारी एकाही नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली नाही. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थितीबद्दल एक दिलासादायक बातमी दिली आहे.
राजेश टोपे यांनी राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होत चालल्याचे सांगितले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे एएनआयशी बोलताना म्हणाले, राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे आणि राज्यातील एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे आणि जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे यासाठी शासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे.