IPL 2022 | “या” घातक गोलंदाजाचं 9 वर्षानंतर पुनरागमन होणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ जानेवारी । आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठी (IPL 2022) अवघे काही दिवस राहिले आहेत. लवकरच या 15 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मोसमातील सर्व सामने हे महाराष्ट्रातच खेळवण्यात येणार असल्याचं समजतंय. दरम्यान या मोसमातून 9 वर्षानंतर वर्ल्ड कप विजेता खेळाडू पुनरागमन करण्याची शक्यता आहे. एस श्रीसंतने (S Sreesanth) आयपीएलच्या 15 व्या मोसमासाठीच्या लिलावात आपलं नाव नोंदवलंय. त्यामुळे तो 9 वर्षानंतर खेळताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (team india faster bowler s sreesanth registred his name for ipl 2022 auction)

श्रीसंत आयपीएलमध्ये अखेरचा 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, आयपीएल 2022 च्या लिलावासाठी श्रीसंतने त्याची बेस प्राईज 50 लाख रुपये ठेवली आहे. श्रीशंतने 14 व्या मोसमात स्वत:ची बेस प्राईज ही 75 लाख ठेवली होती. मात्र तो तेव्हा अनसोल्ड राहिला होता.

7 वर्षांसाठी बंदी

श्रीसंतवर आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता.यानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाने ती बंदी उठवली. न्यायालयाने केवळ 7 वर्षांचीच बंदी असेल, असं जाहीर केलं होतं. श्रीसंत बंदीनंतर 2020 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला.

यानंतर श्रीसंतचा रणजी करंडक स्पर्धेसाठी 24 जणांच्या केरळ संघात समावेश करण्यात आला होता. पण कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. श्रीसंतने शेवटचा प्रथम श्रेणी सामना 2013 मध्ये खेळला होता. इराणी कपमधील हा सामना मुंबई विरुद्ध शेष भारत यांच्यात खेळवण्यात आला होता. श्रीसंतने तेव्हा शेष भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे आता आयपीएल लिलावात श्रीसंतला कोणता संघ आपल्या ताफ्यात घेतं, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *