Weather Alert: येत्या 12 तासात उत्तर कोकणात धुळीचे वारे, मुंबई-ठाण्यासह या जिल्ह्यांना IMDचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । गेल्या चोवीस तासांत उत्तर आणि लगतच्या मध्य व पश्चिम अरबी समुद्रात वादळी वारे (Gusty wind) वाहिले आहेत. याचा फटका गुजरात किनारपट्टीसह उत्तर कोकणाला बसला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात एक वेगळंच अस्मानी संकट घोंघावत आहे. येत्या 12 तासांत उत्तर कोकणात धुळीचे वारे (dust layer wind) वाहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. याचा एकंदरित परिणाम मुंबईसह उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जाणवणार आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने आज मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना धुळीच्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. संबंधित जिल्ह्यात पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. येत्या बारा तासांत याठिकाणी धुळीचे वारे वाहणार आहेत. हे वारे 20 ते 30 किमी प्रतितास वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

तर, दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा परिसरात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच याठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली असून वातावरणात थंडगार वारे वाहत आहेत. येत्या काही तासात याठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्यापासून राज्यात कोरडं हवामान राहणार असून पुढील चार दिवसांसाठी कोणताही इशारा देण्यात आला नाही.

दुसरीकडे, राज्यात गेल्या चोवीस तासात अनेक ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद झाल्याने किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. तसेच वातावरणात आर्द्रतेचं प्रमाण देखील वाढलं आहे. आज उस्मानाबाद 16, नांदेड 16.6, जालना 14, सोलापूर 15.3, कोल्हापूर 18.8, नाशिक 14.8, चिखलठाणा 15.4, जळगाव 14, बारामती 15.5, महाबळेश्वर 11.9, पुणे 17.2 आणि सांगलीत 17.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *