महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी । शहर आणि परिसरात मंगळवारपर्यंत (ता. २५) पहाटे धुके (Fog) पडण्याची शक्यता हवामान (Environment) विभागाने वर्तवली आहे. पुण्यात रविवारी थंडीत (Cold) चांगलीच वाढ झाली होती. तसेच, गुरुवारपर्यंत (ता. २७) पुण्यात थंडीचा कडाका वाढणार असून, किमान तापमान (Temperature) नऊ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आखाती देशांतून येणाऱ्या धुळीच्या वादळामुळे शहर आणि परिसरात रविवारी उशिरापर्यंत धुक्याचे साम्राज्य पसरले होते. तसेच, ढगाळ हवामान, धुके, धुळीच्या वादळामुळे दृष्यमानता कमी, दिवसभर वाऱ्याच्या प्रभावामुळे थंडी अशा मिश्र वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी घेतला. अधूनमधून ऊनदेखील पडत होते. गेल्या दोन दिवसांपासून शहर व परिसरात किमान तापमानात लक्षणीय वाढ होत आहे, असे असले तरी कमाल तापमानात होणारी घट आणि त्यात थंड वारे, यामुळे शहरात गारठा जाणवू लागला आहे. शनिवारी शहरातील कमाल तापमान २४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले, तर सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात सहा अंशांनी घट झाली होती. त्यामुळे दिवसाही थंडीची अनुभूती होत आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारनंतर (ता. २८) शहर व परिसरात सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पुण्यात पुढील चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून, किमान तापमानाचा पाराही घसरणार आहे. मात्र, त्यांनतर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. तसेच, थंड व कोरड्या हवामानामुळे थंडीत वाढ झाली. दरम्यान, पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. तसेच, उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस पडत होता. मात्र, आता राज्यात कोरडे हवामान कायम राहणार असल्याने पुढील तीन दिवस किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंशाने घट होणार असून, अनेक ठिकाणी धुके पडण्याचा अंदाज आहे, त्यामुळे राज्यात गारठा वाढेल. राज्यात रविवारी सर्वाधिक कमाल तापमान वाशीम येथे ३२ अंश सेल्सिअस आणि नीचांकी तापमानाची नोंद ११.९ अंश सेल्सिअस महाबळेश्वर येथे झाली.