India : टीम इंडिया पुढील ५ महिन्यात ४ संघांशी भिडणार, आफ्रिकेशी हिशेब चुकता करण्याचीही संधी; पाहा संघाचं आगामी वेळापत्रक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ जानेवारी । दक्षिण आफ्रिकेत भारताला वन डे मालिकेत ३-० असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या दोन सामन्यात आफ्रिकेने सहज भारतावर मात केली. तिसऱ्या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत खेळ रंगला, पण अखेर सामना आफ्रिकेच्याच झोळीत पडला. दक्षिण आफ्रिकेत जे घडलं ते नक्कीच बदलता येणार नाही. पण पुढील काही महिन्यात भारतीय संघाला आपली कामगिरी सुधारणं गरजेचं आहे. येत्या पाच महिन्यांच्या कालावधीत भारत चार संघांशी दोन हात करणार आहे. याच कालावधीत भारताला आफ्रिकेशी हिशेब चुकता करण्याचीही संधी मिळणार आहे. पाहा नक्की कसं आहे टीम इंडियाचं पुढच्या चार महिन्याचं वेळापत्रक…

वेस्ट इंडिजचा भारत दौरा-वेस्ट इंडिजचा भारत दौरा ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर कॅरेबियन संघाला ३ वन डे आणि त्यानंतर ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवले जातील. तर टी२० मालिकेतील सामने १६, १८ आणि २० फेब्रुवारीला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवले जातील.

श्रीलंकेचा भारत दौरा- वेस्ट इंडिजच्या पाहुणचारानंतर भारत श्रीलंकेचा पाहुणचार करणार आहे. कसोटी आणि टी२० मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा संघ फेब्रुवारी अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात २५ फेब्रुवारी ते ९ मार्च या दरम्यान २ कसोटी सामने खेळले जातील. तर १३ ते १८ मार्च दरम्यान ३ टी२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

अफगाणिस्तानचा भारत दौरा- श्रीलंकेसोबतची मालिका संपल्यावर अफगाणिस्ताचा संघ भारतात येणार आहे. अफगाणिस्तान भारताविरूद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. IPL 2022 सुरू होण्यापूर्वी ही मालिका खेळली जाईल. या मालिकेत भारताच्या बड्या आणि अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्याचीही शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेशी हिशेब चुकता करण्याची संधी- IPL 2022 मे अखेरीस संपेल. त्यानंतर भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर उतरेल. त्यावेळी भारताला आफ्रिकेशी हिशेब चुकता करण्याची संधी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका भारत दौऱ्यावर ५ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही क्रिकेटचे फॉरमॅट वेगळे असले तरीही भारत वन डे मालिकेतील ३-०चा बदला टी२० मालिका ५-०ने जिंकून घेऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *