एकाच वेळी तब्बल आठ सहकारी बँंकांवर केली कारवाई ; ‘आरबीआय’चा बडगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । कर्ज आणि त्यासंबधीची नियमावली, ग्राहकांमध्ये जनजागृती न करणे, केवायसी नियमांची पायमल्ली यासारख्या गंभीर बाबींची दखल घेत रिझर्व्ह बँकेने देशभरातील आठ नागरी सहकारी बँकावर एकाच वेळी दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकांना १ ते ४ लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.

नागरी सहकारी बँकांच्या कार्यपध्दतीवर रिझर्व्ह बँकेची करडी नजर आहे. सुरतमधील दि असोसिएट को ऑप बँकेला संचालक आणि त्यांच्या नातेवाईकांच्यासंबधी कर्ज देवताना केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याचे आरबीआयच्या निदर्शनात आले आहे. याकरिता आरबीआयने दि असोसिएट को ऑप बँकेला ४ लाखांचा दंड ठोठावला आहे.

सुरतमधील दि वराच्छा को ऑप बँकेला १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेने ठेवीदार जनजागृती निधीसंदर्भात नियंमाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. मुंबईतील मोगवीरा को ऑप बँकेला रिझर्व्ह बँकेने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या केवायसी संबधी नियम न पाळल्याने रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आली.

नागरी सहकारी बँकाच्या संचालकांसंदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वसई जनता सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. संचालकांच्या कर्ज नियमावलीबाबत राजकोट पीपल्स को ऑप बँकेला १ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याशिवाय भंडारी को ऑप अर्बन बँकेला दोन लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने जम्मू सेंट्रल को ऑप बँक आणि जोधपूरमधील जोधपूर नागरिक सहकारी बँक या दोन बँकांना देखील प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेकडून एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येत नागरी सहकारी बँकांवर कारवाई करण्याची ही अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *