महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. सध्या गोव्यात चांगलेच राजकीय वातावरण तापल्याचे चित्र दिसत आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मात्र, यामध्ये भाजपने गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांना टिकीट दिले नाही. त्यानंतर उत्पल यांनी अपक्ष म्हणून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
अपक्ष म्हणून भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. माझ्या वडिलांनी या विधानसभा मतदारसंघात खूप काम केले आहे. पक्षाची ताकद वाढवली आहे. जवळपास 2 दशके त्यांचे वास्तव्य येथे होते. येथील सर्व कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध आहेत. त्या सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीचे काम केले असल्याचे उत्पल पर्रिकर म्हणाले.
तुम्ही राजकारणात यावे, असे तुमच्या वडिलांना वाटत नव्हते असा प्रश्न उत्पल पर्रिकर यांनी विचारल्यानंतर ते म्हणाले की, मतदारसंघात खूप चुकीचे घडत असल्याचे मी पाहिले. तेव्हा कोणाला तरी उभे राहावे लागणार होते. मी त्यांचा मुलगा आहे म्हणूनच, आज राजकारणात आलो आहे. पक्ष मला संधी देईल, अशी आशा होती. गेल्या वेळी मी निवडणूक लढवू शकलो असतो, कारण पक्षाचे सर्व कार्यकर्ते मला तसे करण्यास सांगत होते. पण मी पक्षाच्या पाठीशी उभा राहिलो. तेव्हा मी ते मान्य केले आणि काहीही बोललो नाही असे उत्पल पर्रिकर यावेळी म्हणाले.
या भागातून भाजपने ज्या उमेदवाराला तिकीट दिले आहे ते डिफॉल्टर आहेत. त्यांनी नेहमीच भाजपच्या विरोधात काम केले आहे. येथील मतदार त्यांना मतदान करू इच्छित नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचे काम करायचे नाही. त्यांच्यावर बलात्कार आणि इतर अनेक गुन्हे दाखल आहेत. मी राजीनामा देताना पक्षाला सांगितले होते की, या जागेवर चांगला उमेदवार द्या, मी घरी जाईन, असेही यावेळी पर्रिकर म्हणाले.