महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण दिले आहे. दहा दिवसांच्या आत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण येऊन नंतर नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. त्यामुळे नितेश राणे यांची अटक अटळ असल्याचे मानले जात आहे.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाच्या याचिकेवर सरन्यायाधीश ए.व्ही. रमणा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली त्या वेळी जिल्हा न्यायालयात शरण येऊन नितेश राणे यांनी नियमित जामीन अर्ज दाखल करावा, असे निर्देश देऊन या प्रकरणात व्यक्तिगत स्वातंत्र्याचे परस्परविरोधी दावे आणि योग्य तपास यात समतोल साधला जावा, असे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या काळात १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.
याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले होते. तिथेही राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, नितेश राणे कणकवली पोलिस ठाण्यात तीन वेळा चौकशीस सामोरे गेले होते. पोलिस तपासात आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले होते. दरम्यान, नितेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टातही फेटाळल्याचे वृत्त कळताच त्यांचे पिता केंद्रीय मंत्री नारायण राणे दिल्लीहून कोकणकडे रवाना झाल्याचे कळते.