महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; पिंपरी चिंचवड ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साद घातलेल्या जनता कर्फ्यू पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक नोंद झाली आहे. शहरात काल म्हणजेच रविवारी (२२ मार्च) कोरोनाच्या नियमाचा भंग वगळता एकही गुन्हा नोंद झालेला नाही. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात गुन्हा दाखल न होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची स्थापना 15 ऑगस्ट 2018 साली झाली. तेव्हापासून चोरीचे वेगवेगळे फंडे, फिल्मी स्टाईल दरोडे, पोलिसांना बुचकळ्यात पाडणाऱ्या हत्या, अपहरण, बलात्कार, विनयभंग असे एकामागेएक गुन्हे घडत आहेतच. पण गुन्हा नोंद न होण्याचा असा एकही दिवस नव्हता. मात्र जनता कर्फ्यूच्या दिवसाने त्याची कसर भरुन काढली.
कोरोना व्हायरसमुळे काल सर्व नागरिक जनता कर्फ्यूमध्ये सामील झाले होते. परिणामी भुरटे-सुरटे गुन्हेगार ही कोरोनाला धास्तावल्याने त्यांनी घर सोडले नाही. म्हणूनच आयुक्तालयाच्या इतिहासात एकाही गुन्ह्याची नोंद झाली नाही. अपवाद फक्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर कारवाई केली आहे.