महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणात ठेवण्यामध्ये मास्क व लसीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यामुळे बाहेरच्या देशांमध्ये काय सुरू आहे, त्यापेक्षा आपल्याकडे काय सुरू आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. यामुळे महाराष्ट्रात तूर्तास मास्क मुक्तीचा निर्णय होणार नसल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत आपण सर्व निर्णय जागतिक आरोग्य संघटना व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घेतले आहेत. त्यांच्याकडून स्पष्ट सूचना आल्यानंतरच मास्कमुक्तीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून त्याचा फटका महाराष्ट्राला नैसर्गिक आपत्तींच्या रूपातून बसत आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांचा विचार करून शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुण्यात चांगले हवामान राहावे यासाठी क्लायमेट अॅक्शन प्लॅन तयार केला जात आहे. भविष्यात गोदावरी तसेच उपनद्यांचे संवर्धन करणे गरजेचे असून त्यासाठी जनसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी औरंगाबादच्या खाम नदीचे उदाहरण दिले.
उत्तर प्रदेश, गोवा येथील विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारले असता त्यांनी आता राज्याबाहेरदेखील शिवसेनेचा विस्तार सुरू झाला असून शिवसेनेने उमेदवारीदेखील जाहीर केले असल्याचे स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाच्या भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्यासंदर्भात दिलेल्या आदेशाबाबत विचारले असता यासंदर्भात विधिमंडळाचे नेमके कायदे काय आहेत हे तपासून निर्णय घेतला जाईल, असे सांगत ठाकरे यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
सुपरमार्केटमधून वाइन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेबाबत आदित्य यांनी, “ते नेहमीच प्रत्येक योजनेवर टीका करतात. त्यामुळे मी त्यांच्याविषयी बोलणार नाही’ असा चिमटा घेतला. मात्र, सध्या राज्यातील महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुपरमार्केटमधून वाइन विक्री होणार असल्याचे ते म्हणाले.