महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । एअर इंडिया गुरुवारपासून पुन्हा टाटा समूहाच्या ताब्यात आली. त्यानंतर आजपासून एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रवाशांचे विशेष उद्घोषणा देऊन स्वागत करण्यात आले. एअर इंडियाची मालकी टाटा समूहाकडे पुन्हा आल्याचा उल्लेख त्यात आवर्जून करण्यात येत आहे. तसे अधिकृत आदेशच समूहाकडून देण्यात आले आहेत.
टाटा समूहाच्या ताब्यात आल्यानंतर एअर इंडियाच्या दिल्ली ते मुंबई अशा पहिल्या विमानाने आज उड्डाण केले. विमानाने टेकओव्हर केल्यानंतर उद्घोषणा सुरू झाली. ‘प्रिय प्रवाशांनो, मी तुमच्या विमानाचा कॅप्टन बोलत आहे. या ऐतिहासिक उड्डाणात तुमचे स्वागत आहे. आजपासून एअर इंडिया सात दशकांनंतर पुन्हा एकदा टाटा समूहाचा भाग झाली आहे. या उड्डाणादरम्यान तसेच प्रत्येक उड्डाणादरम्यान आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सेवा देऊ इच्छितो.’
प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे हे टाटा समूहाचे प्राधान्य आहे. म्हणूनच ‘एअर इंडियाच्या उज्ज्वल भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.’ असे वाक्यही उद्घोषणेमध्ये समाविष्ट केले गेले आहे आणि शेवटी ‘तुमचा प्रवास आनंददायी आणि सुखकर होईल अशी इच्छा व्यक्त करतो, धन्यवाद’ असे म्हणत कॅप्टन प्रवाशांचे आभार मानतात.