महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । राज्यात १५ ते १८ वयोगटातील ५० टक्के लहान मुलांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. गुरुवारपर्यंत (ता.२६) राज्यातील ३० लाख मुलांचे लसीकरण (Vaccination) झाले. भंडारा जिल्हा ७५ टक्के लसीकरण पूर्ण करून पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई अद्याप पिछाडीवर असून ६ लाख पात्र मुलांपैकी केवळ ३६.४०% म्हणजेच २ लाख २२ हजार ९४६ मुलांनीच लस घेतली आहे. (Maharashtra Under 18 Vaccination)
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यांतही ५० टक्क्यांच्यावर लहान मुलांचे लसीकरण झाले आहे. राज्यात ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वयोगटातील ६० लाख ६३ हजार मुलांपैकी ४९.९९% म्हणजेच ३० लाख ३१ हजार ७२ मुलांनी गुरुवारपर्यंत लस घेतली आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झाले आहे; तर २१ जिल्ह्यांमध्ये सरासरी ७५ ते ५० टक्के लसीकरण पार पडले आहे. त्यापैकी भंडारा जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील ७५ टक्के म्हणजेच ४५ हजार २१९ मुलांचे लसीकरण झाले आहे.