महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २९ जानेवारी । तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत दयाबेनची भूमिका करणारी दिशा वाकानीने पुन्हा मालिकेत काम करावे अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. आता सध्या दिशासोबत याबाबत चर्चा सुरू असून दिशा काम करण्यास तयारही झाली आहे. मात्र कमबॅक करणार असल्याचे समजते. दिशाने मालिकेत पुन्हा काम करण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या असून त्यामुळे सध्या तिच्या कमबॅकवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दय़ाबेनची भूमिका करणारी दिशा ही 2017 पासून मालिकेपासून दूर आहे. गेल्या अनेक वर्षात अनेक कलाकार बदलले. मात्र दिशाच्या दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीला इतक्या वर्षात घेण्यात आले नाही. आता चार वर्षानंतर दिशा पुन्हा एकदा या मालिकेत काम करायला तयार झाली आहे.
मात्र दिशाने या मालिकेसाठी मोठी किंमत मागितली आहे. तिने या मालिकेत काम करायला प्रत्येक एपिसोडसाठी दीड लाख रुपये मागितले आहेत असे समजते. तसेच ती दररोज अवघे तीन तासच शूटींग करणार असून त्यादरम्यान सेटवर तिच्या मुलीसाठी नॅनी व नर्सरीची सोय करण्यास तिने सांगितले आहे. तिच्या या मागण्यांचा निर्माते विचार करत असून जर ही बोलणी यशस्वी झाली तर दिशा लवकरच मालिकेत कमबॅक करू शकते.