महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । राज्यात नाशिक, नागपूर, पुणे, संभाजीनगर अशा शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात तिसऱया लाटेचा उच्चांक येऊन गेला आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोना रुग्ण, मास्कचा वापर, नवीन व्हेरियंट यासंदर्भात राजेश टोपे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. शहरी भागातील रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी ग्रामीण भागातही रुग्ण वाढत आहेत; परंतु हे रुग्ण पाच ते सात दिवसांच्या उपचारानंतर बरे होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाढणारी बाधितांच्या संख्येयाबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही असे ते म्हणाले.
राज्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मास्क वापरण्याची आवश्यता नाही अशी चर्चा टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून सुरु झाली आहे. यावरही राजेश टोपे यांनी सविस्तर खुलासा केला. मास्कमुक्त महाराष्ट्र असे आम्ही कधीही म्हणालो नाही. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे टास्क फोर्सने याबाबत मार्गदर्शन करावे. राज्यातील निर्बंध अजून किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळाले तर त्याबाबत लोकांनाही दिलासा मिळू शकेल.