महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । गेल्या 3 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. काही ठिकाणी कर्मचारी कामावर हजर झाल्यामुळे बसेस सोडण्यास सुरुवात झाली आहे. नगर विभागाकडून बसेसच्या संख्येत वाढ करण्यात आल्याने नगर शहरातील माळीवाडा, तारकपूर बसस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे. नागरिकांनी खासगी प्रवाशी वाहतुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू आहे. या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. नगर विभागातील सुमारे 165 कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. ग्रामीण भागामध्ये एसटी नसल्यामुळे खासगी प्रवासी वाहतूकसुद्धा मोठय़ा प्रमाणामध्ये सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात येता आले नाही, अशी परिस्थिती पाहायला मिळाली. दुर्गम भागामध्ये एसटीची सेवा बंद असल्याने खासगी वाहने सर्रासपणे सुरू होती. खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱयांनी प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे घेतले. या संपाचा एसटीला मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच आगारांत काही कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे बसेस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीच्या प्रवासासाठी बसस्थानकांत गर्दी होत आहे. नगर शहरातील तारकपूर, माळीवाडा तसेच पुणे बसस्थानक हे गजबजू लागले आहे.