महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । म्हाडाच्या विविध संवर्गातील ५६५ पदासाठी सोमवारपासून परीक्षा होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी म्हाडा आणि टीसीएस (टाटा कन्सल्टंटसी सव्र्हिसेस) सज्ज झाले आहे. राज्यातील १०६ केंद्रावर परीक्षा होईल. दोन लाख ६० हजार उमेदवार या परीक्षेला बसतील. म्हाडाने ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यानुसार २ लाख ७० हजार अर्ज आले आणि १२, १५, १९ आणि २० डिसेंबर अशा परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या.
परीक्षेला काही तास शिल्लक असताना रात्री उशिरा परीक्षा रद्द करण्यात आल्या. परिक्षेचे कंत्राट ज्या जी ए सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते, त्याच कंपनीच्या एका संचालकानेच पेपरफुटीचा डाव आखला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी त्याचा हा डाव हाणून पाडला आणि यातून म्हाडा भरती परीक्षेचा मोठा गैरप्रकार उघड झाला. सरकारच्या निर्णयानुसार आता म्हाडा स्वत: टीसीएसच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणार आहे. ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान या परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी म्हाडा आणि टीसीएस सज्ज झाले आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच परीक्षार्थीना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर २६ जानेवारीपासून मॉक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. सोमवारपासून परीक्षेला सुरुवात होणार असून यासाठी एकूण १०६ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मात्र विद्यार्थी संख्येनुसार त्या त्या दिवशी केंद्र संख्या कमी अधिक असणार आहे.