महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई ; जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना देशात पाय पसरू लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात ही संख्या सर्वाधिक म्हणजेच 102 इतकी झाली आहे. ते रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या 102 पैकी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयातील 12 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. असे असले तरी त्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा घरी सोडण्यात येईल.
महापालिका रुग्णालयात डॉक्टर घेत असलेल्या परिश्रमाला यश आले असून 12 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. यापैकी 5 जण आधीच बरे झाले होते. त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आज आणखी 7 जण बरे झाले आहेत.
दरम्यान या विषाणूची लागण होऊ नये म्हणून मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केले आहे.