महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाइन होत आहे. मग परीक्षा ऑफलाइन कशासाठी? असं म्हणत दहावी-बारावीचे विद्यार्थी काल राज्यभरात रस्त्यावर उतरले होते. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती. या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी विकास पाठक याच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. धारावी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली.
जमाव बंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी तसंच महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अंतर्गत दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाचा पत्ता हिंदुस्थानी भाऊनेच विद्यार्थ्यांना दिल्याचं त्याच्या एका व्हिडिओमधून समोर आलं आहे.
ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांना भडकवणारा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यात मुंबई, पुणे, नागपूरमध्ये आंदोलन करण्याबाबत विद्यार्थ्यांना सांगण्यात आलं होतं. हे ठरवून केलेलं षडयंत्र होतं असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांकडून कोणते निवेदन देण्यात आले का याची माहिती नाही. मात्र जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यामधून आंदोलन करण्याबाबतची माहिती समोर आली होती. सर्वांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं.