महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ फेब्रुवारी । शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणामुळे आमदार नितेश राणे हे अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी संशयित असलेल्या नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या प्रकरणावर आज कोर्ट निर्णय देणार आहे. आज दुपारी 3 वाजता हा निर्णय दिला जाईल. दरम्यान त्यापूर्वीच नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या स्वीय सहाय्यकाला पोलिसांनी चार दिवसांची कोठडी सुनावली आहे.
नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक सचिव राकेश परब सोमवारी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये सकाळी हजर झाले होते. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी आज सकाळी त्यांना कोर्टासमोर हजर केले होते. यानंतर त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनवाण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. यामध्ये इतर आरोपींना अटक, मोबाइल हस्तगत करणे असे मुद्दे देखील मांडण्यता आले होते. मात्र न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज अंतिम सुनावणी होणार आहे. आज दुपारी तीन वाजता सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय आपला अंतिम निकाल सुनावणार आहेत. त्यामुळे नितेश यांना दिलासा मिळतो की, जेलमध्ये जावे लागते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच 10 दिवसात न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने मंगळवारी दुपारी तीन वाजता अंतिम फैसला सुनावणार असल्याचे म्हटले आहे.