१९ वर्षांखालील वनडे वर्ल्डकप; उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाशी गाठ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ फेब्रुवारी । १९ वर्षांखालील (युवा) वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या लढतीत बुधवारी (२ फेब्रुवारी) माजी विजेता भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडेल. या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत साखळी फेरीतील सातत्य आणि अपराजित भारताचे पारडे निश्चितच जड आहे.

गटवार साखळीत आयर्लंडविरुद्धच्या (दुसऱ्या) सामन्यापूर्वी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने भारताचे सहा क्रिकेटपटू आयसोलेशनमध्ये गेले. यात कर्णधार यश धुल, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्या यादव आणि मानव पारीख यांचा समावेश होता. युगांडाविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यातही खेळले नव्हते. मात्र, मजबूत बेंच स्ट्रेंथच्या जोरावर भारताने हे सामने सहज जिंकून गटातील अव्वल संघ ठरण्याचा मान मिळवला. यादरम्यान धुलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूनं संघाची कमान सांभाळली होती. गटवार साखळीत तिन्ही सामने जिंकण्याची करामत साधणाऱ्या भारताने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेता बांगलादेशला बाहेरचा रस्ता दाखवला. विजयाच्या चौकारामुळे धूल आणि सहकाऱ्यांनी फायनलसाठी प्रबळ दावेदारी पेश केली आहे.

उभय संघांमधील मागील पाच सामन्यांचा विचार करता, भारताने कांगारूंवर ४-० असा वरचष्मा राखला आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाला. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांत शेवटचा सामना झाला. त्यात भारताने मोठ्या फरकाने ऑस्ट्रेलियावर मात केली आहे.

बाद फेरीत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव भारतासाठी जमेची बाजू आहे. भारताने सलग चौथ्यांदा (२०१६, २०१८, २०२०, २०२२) युवा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. मुख्य म्हणजे मागील तिन्ही वेळेस भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.

दुसरीकडे, ड गटात दुसरे स्थान मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने क गटातील टॉप संघ असलेल्या पाकिस्तानला हरवून यंदाच्या स्पर्धेतील एक महत्त्वपूर्ण विजय नोंदवला. त्यामुळे भारताला प्रतिस्पर्ध्याला कमी लेखून चालणार नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *