महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ फेब्रुवारी । भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. पण आज त्यांनी हा अर्ज मागे घेतला.
त्यानंतर नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे शरणागती पत्करली. त्यानंतर ते कणकवली दिवाणी न्यायालयात दाखल झाले. चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं नितेश राणे यांचे वकील अॅड. सतिश मानेशिंदे यांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना अटकेपासून 10 दिवसांचं संरक्षण दिलं आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर
सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं, आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने राज्य सरकारने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण मी आज स्वत:हून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात असल्याची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.