पुण्यात रात्रीच्या अंधारात मजुरांवर ‘काळ’ कोसळला ; इमारतीचा स्लॅब पडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ फेब्रुवारी । पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Pune Building Slab Collapse) कोसळून गुरुवारी रात्री भीषण दुर्घटना घडली. स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकून पाच कामगारांना (Labors Death) जागीच प्राण गमवावे लागले, तर किमान पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे हे सर्व कामगार परराज्यातील असल्याचं येरवडा पोलिसांनी सांगितलं. मॉलच्या तळ मजल्याचे काम सुरु असताना रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

फारुक वाडिया यांची ही जमीन असून अहलुवालिया यांची साईट असल्याचा दावा राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी केला आहे. आगामी अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा उपस्थित करणार असल्याचंही टिंगरे म्हणाले.

महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचे प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. ही घटना रात्री 10.45 वाजताच्या सुमारास येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली

स्लॅबच्या जाळ्यामध्ये अडकलेल्यांपैकी काही जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब टाकायचे काम सुरु होते. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने चार गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *