महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे : गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील पहिले करोनाग्रस्त दाम्पत्य अवघ्या १४ दिवसांतच करोनामुक्त झाले आहे. त्यामुळे या दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला असून काही वेळातच हे दाम्पत्य घरी जाणार आहे. आणखी ३ करोना रुग्णही बरे झाल्याने त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
हे दाम्पत्य दुबईहून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना करोना झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर त्यांना ९ मार्च रोजी नायडू रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना विलगीकरण कक्षातही ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या २४ तासात त्यांची दोनदा तपासणी करण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या दाम्पत्याला डिस्चार्ज दिला आहे. डिस्चार्ज झाल्यानंतर या दाम्पत्याचा रुग्णालय प्रशासनाकडून सत्कार करण्यात आला. थोड्या वेळाने या दाम्पत्याला घरी पाठवण्यात येणार आहे. तसेच इतर आठ रुग्णही बरे झाले असून त्यांनाही डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.