महाराष्ट्र २४- ऑनलाईन – पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून देशभरात लॉकडाऊन असला तरी प्रत्येक राज्यातील कोठारांमध्ये पुरेसा धान्यसाठा आहे. तसेच भारतीय अन्न महामंडळाकडे देशात किमान तीन वर्षे पुरेल इतका धान्यसाठा असल्यामुळे नागरिकांना धान्य साठवून ठेवण्याची गरज नाही. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुबलक साठा असल्याने जनतेने धान्य साठवून ठेऊ नये, असे आवाहन केले.
कोरोनामुळे देशभरात सध्या भीतीचे वातावरण आहे. मॉलपाठोपाठ आता दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. काही दिवसांनी धान्य मिळणार नाही, असा समज पसरल्यामुळे अनेकांनी दोन ते तीन महिन्यांचा धान्यसाठा केला आहे. प्रत्यक्षात देशात सध्या 585 लाख मेट्रिक टन धान्यसाठा पडून आहे. देशाच्या गरजेपेक्षा हा साठा तीनपट असल्यामुळे लोकांना धान्य साठवून ठेवण्याची काहीही गरज नाही, अशा शब्दात भारतीय खाद्य निगम कर्मचारी संघाचे विभागीय सचिव आर.एस. नाईक यांनी दिलासा दिला आहे
केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय अन्न महामंडळाकडून विविध राज्यांच्या योजनांसाठी धान्य पुरवठा केला जातो. केंद्र सरकारने देशातील सर्व वाहतूक सेवा बंद केल्या आहेत. त्यामधून मालगाडी वगळण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या राज्याने धान्याची मागणी करताच, तत्काळ पुरवठा केला जाईल. याबाबत महामंडळाच्या कर्मचार्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.