लवकरच पेट्रोल जाणार १२५ रुपयांवर?; मार्चमध्ये इंधनाची दरवाढ अटळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . 6 फेब्रुवारी । भविष्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडण्याची शक्यता आहे. देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे. यावरुन इंधनदर वाढीवर सरकारचे नियंत्रण आहे. हे सिद्ध होत असले तरी जनतेची दिशाभूल करण्यासाठीच केंद्र सरकार कंपन्यांवर आमचे नियंत्रण नसल्याचे सांगत सर्वसामान्य नागरिकांची बोळवण करीत आहे. निवडणुका संपताच पेट्रोल प्रति लिटर १२० रुपयावर जाण्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सौदी अरामकोने मार्च महिन्यासाठी आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचे भाव वाढवले आहेत. कंपनीने सर्व कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळेही भाववाढ होण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये १४ राज्यांमधील ३० विधानसभा आणि तीन लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तीन नोव्हेंबरला केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात दहा रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ८३ दिवस इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे पाच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर इंधन कंपन्या दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारची भूमिका काय?
१६ जून २०१७ पासून दररोज इंधनाच्या दर निश्चितीचे धोरण तयार करण्यात आले. त्यानुसार साडे चार वर्षात दररोज दरवाढ अपेक्षित होती. निवडणूक नसताना दररोज दरवाढ केली जाते. निवडणुकीच्या रणधुमाळीत ती दरवाढ थांबते. पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात सरकारची भूमिका नाही, असे अनेकदा सरकारकडून म्हटले जाते. मात्र, निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे पेट्रोलियम कंपनीवर सरकारचे नियंत्रण नाही असे म्हणणे म्हणजे पूर्णपणे सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

निवडणुका आटोपल्यानंतर दरवाढ
शहरांत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर आहे. शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. सात मार्चनंतर पाचही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका आटोपताच पेट्रोलच्या दरात वाढ होण्यास सुरवात होईल आणि १२० ते १२१ रुपये प्रति लिटर पेट्रोलचे दर जातील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *