महाराष्ट्र २४ ऑनलाईन; तिरुवनंतपुरम – कोरोनाव्हायरस इतक्या झपाट्याने कसा पसरतो आहे, याचा अंदाज केरळमधील या प्रकरणावरून येईल. फक्त एका व्यक्तीमुळे 20 मिनिटात 4 जणांना व्हायरसची लागण झाली आहे. केरळच्या कासारगोडमधील पेशंट 2 फक्त 20 मिनिटांत ज्यांच्या संपर्कात आला, त्या सर्वांना या व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं. कासारगोडचे जिल्हाधिकारी डी. संजीत बाबू यांनी पेशंट 2 मुळे फक्त 20 मिनिटांत 4 जणांना व्हायरसची लागण झाल्याचं म्हटलं आहे.
कासरगोडमध्ये कोरोनाव्हायरसचा आढळलेला दुसरा रुग्ण पेशंट 2 दुबईहून भारतात आला होता. 16 मार्चला त्याला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. त्याने चाचणीसाठी स्वॅबचा नमुना दिला, त्यानंतर त्याला घरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला. तो स्वत:ला आयसोलेट करून घेण्यापूर्वी 20 मिनिटांमध्येच त्याने तब्बल 4 जणांना कोरोना संक्रमित केलं. आयसोलेशनपूर्वी विमानतळाहून कारमधून घेऊन जाणारा त्याचा मित्र, त्यानंतर घरी आई, पत्नी आणि मुलगा त्याच्या संपर्कात आले. हे चारही जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. या रुग्णांवरही आता उपचार सुरू करण्यात आलं आहे.
पेशंट 2 नंतर पेशंट 3 च्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही चाचणीची प्रतीक्षा आहे. ही व्यक्ती दुबईहून भारतात आल्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली, ज्यामुळे हजारो लोकांच्या संपर्कात आली होती, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.