वारकऱ्यांनो चंद्रभागेत स्नान करु नका, तीर्थ म्हणून पाणी न पिण्याचे आवाहन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ फेब्रुवारी । वारकरी संप्रदायातील तब्बल ६ वारींवर कोरोनामुळे निर्बंध लागू असल्याने रद्द झाल्यानंतर आज माघशुध्द एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात दाखल झाले आहेत. माघी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच माघी एकादशीनिमित्त साजरा होत असून मराठी वर्षांतील शेवटची आणि वारकरी संप्रदयातील महत्त्वाची मानली जाणारी माघी वारी ही शेवटची असते. तळ कोकण, कोकण, मुंबई, मराठवाडा येथून या वारीसाठी भाविक न चुकता वारीला येतात आणि चंद्रभागेमध्ये स्थान करतात. पण याच चंद्रभागा नदीचे पाणी हे यंदा तिर्थ म्हणूनच काय तर आंघोळ करण्यासाठीही धोकादायक असल्याची माहिती समोर आली.

ही धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालामध्ये समोर आली आहे. हे पाणी तिर्थ म्हणून न पिण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या गणेश अंकुरराव यांनी केले आहे. या पाण्याचे काही नमुने गणेश यांनीच चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल समोर आला असून त्यामधून नदीचे पाणी हे मानवी आरोग्यासाठी धोकायदाक असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. पंढरपुरमध्ये माघी एकादशीनिमित्त तीन लाखांच्या आसपास भाविक दाखल झालेले असतानाच ही माहिती समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

शेवाळ, घाण पाणी, आळ्या-किड्या चंद्रभागा नदीच्या पाण्यामध्ये आहेत. तसेच हे पाणी मैलामिश्रीत असल्याचे गणेश अंकुरराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. चंद्रभागेच्या पाण्यात गढूळपणा आहे. प्रशासनाच्या दबावापोटी भूजल सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप अंकुरराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

चंद्रभागेमध्ये स्नान करणारे भाविक अंग खाजवत होते. तर काहींना फोड्या आल्या होत्या. आम्ही यासंदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला होता. पण याबद्दल प्रशासन काहीच भूमिका घेताना दिसत नाही. माघी वारीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा दर्जा पाहता भाविकांनी नदीमध्ये स्थान करु नये, असे आवाहन प्रशासनाने करणे आवश्यक होते. पण याकडे प्रशासनाने पूर्णपणे दूर्लक्ष केल्याचा आरोप गणेश अंकुरराव यांनी केला आहे.

प्रशासन या माध्यमातून भाविकांच्या जीवाशी खेळत आहे. चंद्रभागा हा भाविकांच्या श्रद्धेचा विषय असल्यामुळेच नदी स्वच्छ व्हावी आणि बदल घडावा यासाठी राज्य शासनाने निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही गणेश अंकुरराव म्हणाले आहेत. तीर्थ म्हणून चंद्रभागेचे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळेच मी महर्षी वाल्मिकी संघातर्फे सर्व भाविकांना आवाहन करतो की हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करु नये, असेही गणेश अंकुरराव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *