मुंबई- पुणेकरांची डेक्कन क्वीन मार्चपासून नव्या रुपात धावणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । मुंबईला वेळेत पोहोण्यासाठी पुणेकरांची हक्काची ‘डेक्कन क्वीन’ येत्या मार्च महिन्यापासून नव्या ‘एलएचबी रेक’सह धावणार आहे. चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर व्हावा, यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘रेक’चे पाच डबे खडकी रेल्वेस्थानकावर दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित डबे आल्यानंतर, डेक्कन क्वीन नव्या रूपात धावणार आहे.

डेक्कन क्वीन या रेल्वेला रेल्वे बोर्डाचा विशेष दर्जा आहे. त्यामुळे या रेल्वेसाठी हिरव्या आणि लांल रंगाने सजलेले डबे प्रवासासाठी सज्ज झाले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वेतील प्रवाशांची आवडती जागा असणारी ‘डायनिंग कार’ही नव्या रुपात येणार आहे. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइने (एनआयडी) या नव्या डब्यांची डिझाइन तयार केली आहे. त्यानुसार चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून या नव्या डब्यांची निर्मिती झाली आहे. या नव्या रेकमध्ये एकूण २० डबे असून, त्यातील दहा डबे राज्यात आले आहेत. त्यातील पाच डबे खडकीच्या रेल्वेस्थानकावर दाखल झाले आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन क्वीन पुण्याहून दररोज सकाळी सव्वासात वाजता आपल्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावत असल्याने सध्या तरी रेकबाबत कोणतीही अडचण नाही. नव्या रेकचे सध्या दहा डबे उपलब्ध झाले आहेत. आणखी दहा डबे आल्यावर, संपूर्ण २० डब्यांची नवी रेक पूर्ण होईल. त्यानंतर साधारण मार्च महिन्यापासून नव्या रेकसह डेक्कन क्वीन धावण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, डेक्कन क्वीन मुंबई रेल्वे विभागाची रेल्वे असल्याने, त्याबाबतचे महत्त्वाचे निर्णय मुंबई कार्यालयातून घेण्यात येतात. काही दिवसांपूर्वीच ‘डेक्कन क्वीन’ला विस्टा डोमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

डायनिंग कार (रेल्वेतील हॉटेल) असणारी डेक्कन क्वीन ही देशातील एकमेव रेल्वे आहे. ही डायनिंग कार उपलब्ध होत नसल्याने, नव्या रेकला येण्यासाठी उशिर झाला. आताच्या डायनिंग कारमध्ये ३२ जणांची आसन क्षमता आहे. नव्या डायनिंग कारमध्ये आसनक्षमता ४० पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या डायनिंग कारमध्ये अधिक प्रवाशांना बसून गरमागरम पदार्थांवर ताव मारता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *