चौफेर महागाईत ग्राहकांना मिळणार दिलासा; खाद्यतेल स्वस्त होण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । जागतिक स्तरावर अनेक बाबतींत सध्या उलथापालथ होत आहे. त्याचा परिणाम म्हणून देशात खाद्यतेल दिवसेंदिवस महाग होत चालले आहे. याची गंभीर दखल घेत सॉल्व्हन्ट्स एक्स्ट्रॅक्टर्स ऑफ इंडियाने (एसईए) आपल्या सदस्या व्यापाऱ्यांना खाद्यतेलाचे भाव किलोमागे तीन ते पाच रुपयांनी कमी करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे येत्या काळात खाद्यतेल स्वस्त होणार आहे. ऐन लग्नसराईत हा मोठाच दिलासा ग्राहकांना मिळणार आहे.

कमाल किरकोळ किंमत अर्थात एमआरपी कमी करा असे आवाहन एसईएने दुसऱ्यांदा आपल्या सदस्य व्यापाऱ्यांना केले आहे. याआधी दिवाळीनिमित्त, नोव्हेंबर २०२१ मध्ये एसईएने व्यापाऱ्यांना खाद्यतेलाच्या किंमतीत प्रति किलो तीन ते पाच रुपयांची कपात करावी, असे आवाहन केले होते.

जागतिक स्तरावर कमालीची अशांतता असली तरी देशातील खाद्यतेलाचे आयातदार खाद्यतेलाचा पुरवठा सुरळित व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. केंद्र सरकारनेही खाद्यतेलाच्या पुरवठ्यात सातत्य ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी भाव कमी करावेत, असे एसईएचे म्हणणे आहे.

एसईएने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, देशात मोहरीचे पिक जोम धरत आहे. त्यामुळे मोहरीच्या खाद्यतेलाचे भाव सुसह्य होण्यास मदत मिळणार आहे. त्यातच सरकारने पामतेलाच्या आयातीवरील शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केल्याचाही फायदा भाव खाली येण्यासाठी होईल, असे एसईएचे म्हणणे आहे.

पामतेलासाठी परवाना?

खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. सर्वसामान्यांसाठी तसेच एफएससीजी उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या पामतेलाचे भावही भडकले आहेत. त्यातच पामतेल मोठ्या प्रमाणावर आयात केले जाते. इंडोनेशियासारख्या पामतेलाची निर्यात करणाऱ्या देशांनी या तेलाचे बाव बेसुमार व मनमानी पद्धतीने वाढू नयेत यासाठी पामतेलाचा परवाना देण्यास सुरुवात केली आहे. या परवाना पद्धतीमुळे पामतेलाचे उत्पादन, निर्यात यांचे काही प्रमाणात नियमन होण्यास मदत मिळणार आहे. एसईएने आपल्या निवेदनात याकडे लक्ष वेधले आहे.

 

जागतिक स्थिती

– जगभरात खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

– रशिया व युक्रेन यांच्यात तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे काळ्या समुद्रालगतच्या प्रदेशात अशांतता आहे.

– काळ्या समुद्रालगतच्या प्रदेशातील सूर्यफूल तेल उत्पादन संकुलाला मोठी आग लागल्यामुळे सूर्यफूल तेलाचा प्रचंड मोठा साठा भस्मसात झाला.

– ब्राझीलसह लॅटिन अमेरिकेमध्ये अल् निना या हवामान बदलाचा परिणाम दिसू लागला असून तेथील सोयाबिनचे पिक मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्यामुळे सोयाबिन तेलाच्या उत्पादनाव परिणाम होणार आहे.

– आयात केल्या जाणाऱ्या खाद्यतेलाच्या पुरवठ्यात वारंवार खंड पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *