Gadge baba Birth Anniversary : गोपालाचे भजन करणाऱ्या गाडगे बाबांचा देवळात जाण्याला का होता विरोध?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ फेब्रुवारी । संत गाडगे महाराज म्हणायचे की शिक्षण ही मोठी गोष्ट आहे. पैशाची कमतरता असेल तर जेवणाची भांडी विकून घ्या, बाईसाठी कमी किमतीचे कपडे घ्या, मोडकळीस आलेल्या घरात राहा पण मुलांना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका. ज्या महापुरुषांचा आधुनिक भारताला अभिमान वाटला पाहिजे, त्यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मानवतेचा खरा परोपकारी, सामाजिक समरसतेचे मूर्तिमंत प्रतिक असे जर कोणी मानले असेल तर ते संत गाडगे होते. 23 फेब्रुवारी हा डेबूजी झिंगारजी जानोरकर उर्फ गाडगे बाबा (Gadge Maharaj Birth Anniversary) यांची जंयती आहे.

गाडगे महाराजांचा पहिला प्रहार

मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप कोणाला मानायचे असेल तर ते संत गाडगे होते. गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव गावात एका धोबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते. गाडगे बाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासुन तयार केलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा.

गाडगेबाबा कोणत्याही गावात गेल्यावर लगेचच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे. त्यांचे काम संपले की ते स्वतः गावातील स्वच्छतेबद्दल लोकांचे अभिनंदन करायचे. गावातील लोकं गाडगे बाबांना जे पैसे द्यायचे त्या पैशांचा नि:स्वार्थपणे सामाजिक विकास आणि समाजाच्या भौतिक विकासासाठी वापर करत असत. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोशाळा, शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहे बांधली. भिक मागून त्यांनी हे सर्व उभारले. पण, या महापुरुषाने आयुष्यभर स्वत:साठी झोपडीही बांधली नाही. त्यांनी आपलं सर्व आयुष्य धर्मशाळांच्या व्हरांड्यावर किंवा जवळपासच्या झाडांखाली घालवले.

वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले बाबा

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. प्रेबोधनासाठी त्यांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यांच्या कीर्तनात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिलं. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांमध्ये गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ होती. लोकांमधील अंधश्रद्धा आणि गरीबी दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते. त्यामुळेच प्रसंगी घरातील वस्तू विका पण आपल्या पाल्यांना शिकवा असे ते सांगायचे.

अंद्धश्रद्धेला बळी पडू नका

गागडे महाराज जरी गोपालाचे भजन करीत असले तरी ते माणसात देव शोधणारे होते. ते नेहमी सांगायचे, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करायचे. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’असे ते म्हणायचे. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. पण आजही त्यांचे विचार आणि आदर्श प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *