महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । ‘नाय वरन भात लोन्चा…’ या चित्रपटातील अल्पवयीन मुलांवरील आक्षेपार्ह दृश्यांमुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरोधात बुधवारी माहीम पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
माहीम पोलिसांनी या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह निर्माते नरेंद्र हिरावत, श्रेयस हिरावत, सहनिर्माते विजय शिंदे यांच्यावर कलम 292, 34 तसेच पोक्सो कलम 14 आणि आयटी कलम 67 व 67 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आक्षेपार्ह ट्रेलरमुळे सामाजिक कार्यकर्त्या सीमा देशपांडे यांनी वकील अॅड. प्रकाश सालसिंगकर यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल करून या प्रकरणी मांजरेकरांसह निर्मात्यांवर कारवाईची मागणी केली होती.