महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : मुंबई : राज्यातील ‘करोना’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. समूहसंसर्गाची लक्षणे अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘करोना’ संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा’, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. बेजबाबदार वागून इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘राज्यात आज सात नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ झाली आहे. जनतेने घरातंच थांबून योग्य काळजी घेतल्यास, खरेदीची गर्दी टाळल्यास, विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. त्यासाठी राज्यातल्या प्रत्येकानं यापुढचे किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, असं अजित पवार म्हणाले.