महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । रेशन कार्ड (Ration Card) हे अतिशय महत्त्वाचं सरकारी डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी कामांसाठी तसंच काही खासगी कामांसाठीही रेशन कार्डची आवश्यकता असते. रेशन कार्ड असं डॉक्युमेंट आहे ज्याद्वारे गरीब-गरजूंना मोफत किंवा कमी दरात धान्य मिळतं. रेशन कार्डच्या आधारे देशातील कोट्यवधी लोक कमी दरात स्वस्त धान्य दुकानातून, रेशन दुकानातून धान्य घेतात.
परंतु अनेकदा गरीब-गरजूंची धान्य दुकानात फसवणूक करण्यात येते. रेशन धान्य डीलर किंवा रेशन दुकानदारांकडून लोकांच्या फसवणुचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेकदा धान्य न मिळाल्याचं किंवा वजनात कमी दिल्याचं, गरजूंच्या वाटणीचं दुसऱ्याच व्यक्तीला धान्य दिल्याच्या घटना घडल्या आहेत. हेच पाहता आता सार्वजनिक वितरण विभाग या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. जेणेकरुन केवळ पात्र लोकांनाच रेशन मिळेल. यात गरीब-गरजूंची फसवणूक होऊ नये हा यामागचा उद्देश आहे.
रेशन-धान्य वितरणाच्या नियमांबाबत सरकार लवकरच काही निर्णय घेणार आहे, त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारांसोबत अनेक बैठका करण्यात आल्या. यात रेशन-धान्य वितरणाबाबत मागवलेल्या सूचनांवर मसुदा तयार करण्यात आला आहे. यात अशी काही मानकं निश्चित करण्यात आली आहेत, ज्याचा लाभ केवळ पात्र आणि योग्य लोकांनाच मिळेल. रेशन-धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक करणं हा याचा मुख्य उद्देश आहे.
रेशन-धान्य, शिधावाटप वितरणाच्या नियमांत बदल झाल्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळणार नाही. कारण जे लोक यासाठी पात्र नाहीत अशा अनेक लोकांनी याचा मोफत किंवा कमी दरात लाभ घेतला आहे. त्यामुळे पात्र असलेल्या योग्य व्यक्तीपर्यत हा लाभ पोहोचत नसल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळेच सरकारकडून आता ही पाऊलं उचलली जाणार आहेत. यामुळे श्रीमंतांना रेशन-धान्य दिलं जाणार नाही.
वन नेशन वन रेशन कार्ड –
वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना लिखित पत्र पाठवलं आहे. सध्या ही योजना देशात 32 राज्य आणि केंद्रशासित राज्यात लागू झाली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशात फक्त एकाच प्रकारचं कार्ड जारी जाईल. वन नेशन वन रेशन कार्डचा मोठा फायदा होणार असून यामुळे कोणताही लाभार्थी कोणत्याही राज्यातून तसंच कोणत्याही दुकानदाराकडून रेशन घेऊ शकेल.
देशात तीन प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी APL कार्ड, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी BLP कार्ड आणि सर्वांत गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय कार्ड आहे. हे रेशन कार्ड सरकार व्यक्तीच्या उत्पन्नावर जारी करते.