महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । रशिया आणि युक्रेनमधील (Russia Ukraine War) युद्धाचा आजचा सहावा दिवस असून, अद्यापपर्यंत यावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी आता वायुसेनेची (Indian Air Force) मदत घेतली जाणार असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश जारी केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत युद्धग्रस्त भागातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय हवाई दलालाही या ऑपरेशनमध्ये सामील होण्यास सांगितले आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीय हवाई दलाची C-17 विमाने आजपासून उड्डाण करण्यास सुरुवात करू शकतात अशी शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे. (Air Force Join For Evacuation Indians From Ukraine)
युक्रेनमधील युद्धग्रस्त शहरे आणि सीमा भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून (Indian Government On Ukraine) वेगाने प्रयत्न करण्यात असून, या सर्व घडामोडींवर पंतप्रधान मोदीही (Narendra Modi) बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ऑपरेशन गंगामध्ये आता वायुसेनेच्या विमानांची मदत घेतली जाणार असल्याने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत येण्याच्या प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होणार आहे.
तीन विमाने नियोजित
आज दुपारपर्यंत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी किमान तीन उड्डाणे नियोजित असून, यामध्ये रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दोन फ्लाइट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून एका फ्लाइट नियोजित असून, ही उड्डाणे मुंबई आणि दिल्लीला पोहोचणार आहेत.