महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १ मार्च । संयुक्त राष्ट्राने फटकारल्यानंतर आणि अमेरिकेसह अनेक देशांनी निर्बंध लादल्यानंतरही रशिया थांबायचे नाव नाही. रशियाचे युक्रेनवर एकामागोमाग एक हल्ले सुरूच आहे. एकीकडे हल्ले आणि दुसरीकडे आता युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा करण्याच्या उद्देशाने रशियाचे सैन्य कूच करत आहे. रशियाने सर्वात मोठे मिलिटरी ऑपरेशन राबवले असून तब्बल 40 मैलांचा (64 किलोमीटर) सैन्य ताफा कीव्हच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. या ताफ्याचे सॅटेलाईट फोटो सध्या व्हायरल झाले असून यामुळे सर्वांचाच थरकाप उडाला आहे.
‘WION’या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, यूएसच्या Maxar Technologies नावाच्या एका खासगी कंपनीने कीव्हच्या वेशीपर्यंत पोहोचलेल्या रशियाच्या सैन्य ताफ्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. युक्रेनविरूद्ध युद्धाची सुरुवात केल्यापासूनचा हा सर्वात मोठा सैन्य ताफा आहे. याआधी रशियाने 27 किलोमीटर लांबीचा सैन्य ताफा पाठवला होता. नव्या सैन्य ताफ्यामध्ये शेकडो वाहने असून यात रणगाडे, अर्टलरी गन, हत्यारबंद गाड्या यांचा समावेश आहे.
युक्रेनच्या उत्तरेकडील सीमेवर देखील रशियाने सैन्य वाढवले असून येथेही जमिनीवह हल्ला करणारी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहे. हे सैन्य अवघे 32 किलोमीटर दूर असून कोणत्याही क्षणी युक्रेनच्या उत्तरेकडील भागत घुसण्यासाठी सज्ज असल्याचे Maxar Technologies ने म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सोमवारी झालेली चर्चा निष्पळ राहिली. रशियन फौजांनी आधी परत जावे, अशी ठाम भूमिका युक्रेनने घेतली, तर युक्रेनियन सैन्याने शस्त्रे खाली ठेवावीत, अशी अट रशियाने ठेवली. त्यामुळे बेलारूसच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात साडेतीन तास सुरू असलेल्या चर्चेतून तोडगा निघालेला नाही असे वृत्त आहे.
युक्रेनमधील हिंदुस्थानी दूतावासाने मंगळवारी एक सूचनावली जारी केली आहे. बस, ट्रेन अथवा मिळेल त्या साधनाने हिंदुस्थानी नागरिकांनी क्वीह सोडावे असे निर्देश यात देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांमध्ये कीव्हमध्ये मोठी घडामोड होणार असल्याची चिन्हे आहेत.