नाशिकच्या ‘आयटी हब’ला लवकरच परवानगी ; नारायण राणे यांचे मनपाला आश्वासन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । आयटी हबसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केल्यास तत्काळ नाशिक महापालिकेच्या आयटी हबला परवानगी दिली जाईल. भिवंडीत साकारणार्‍या आयटी हबलाही परवानगी दिली जाणार असल्याचे आश्वासन सूक्ष्म व लघुउद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले. दरम्यान, आयटी हब प्रकल्पात शिवसेनेकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोप करत ना. राणे यांनी मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

नाशिक महापालिकेतर्फे तसेच महापौर सतीश कुलकर्णी यांचा महत्त्वाकांक्षी आयटी हब प्रकल्प आडगाव शिवारात साडेतीनशे एकरांवर साकारण्यात येणार आहे. त्यासंदर्भात हॉटेल गेट वे येथे आयोजित आयटी कॉन्क्लेव्हप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिकचे सहप्रभारी आमदार जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकूबाई बागूल, भाजप प्रदेश सरचिटणीस देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, प्रदीप पेशकार, हिमगौरी आहेर आडके आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पुढे बोलताना ना. राणे यांनी आयटी पार्कसंदर्भात सुरू असलेल्या राजकारणावर बोट ठेवत शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.

शहर विकासात विरोधाचे राजकारण आणणे योग्य नव्हे. उद्योग, व्यवसाय वाढीसाठी आपण पुढे येत उद्योजकांचे स्वागत केले पाहिजे. परंतु, नाशिकमधील विरोध पाहता मी येणार म्हणून आयुक्तांवर दबाव आणून त्यांना येण्यापासून रोखण्यात आले. हिंदू धर्म आणि मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी लढताना आज शिवसेना कुठेही दिसत नाही. अणु ऊर्जा प्रकल्प नको म्हणून आंदोलन करणार्‍या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनीच सर्व जमिनी घेतल्याचा आरोपही ना. राणे यांनी केला. नवी मुंबईतील विमानतळाबाबतही हीच भूमिका शिवसेनेने घेतली. नाशिकमधील आयटी पार्कलाही माझ्यामुळेच विरोध केला जात असल्याचा दावा करत विकासाला विरोध करणारा पक्ष म्हणजेच शिवसेना, अशी टीकाही त्यांनी केली.

तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, गुजरात हे राज्य पुढे चालले असून, महाराष्ट्र मागे पडत असल्याची बाब निदर्शनास आणून देत महाविकास आघाडी शासनाकडे पत्रव्यवहार करूनही लघुउद्योगांसंदर्भातील बैठक बोलविण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. कार्यक्रमात आयटी हबसंदर्भात विविध प्रकारच्या माहितींचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, भाजप नेते विजय साने, गटनेते अरुण पवार, सभागृहनेते कमलेश बोडके, रवि महाजन, ऋषिकेश वाकदकर, प्रकाश पाठक, विवेक जायखेडकर, पीयूष सोमाणी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *