महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ मार्च । रशियाने शांतता चर्चा निष्फळ ठरल्यानंतर माणसाला भस्मसात करणाऱ्या व्हॅक्युम बॉम्बचा वापर सुरू केला आहे. मंगळवारी युक्रेनची राजधानी कीव्ह आणि खारकीव्हवर जोरदार बॉम्बहल्ले झाले. या दोन्ही शहरांमध्ये वसलेल्या ओख्तिरका शहराच्या लष्करी तळावरही मोठा हल्ला झाला आहे, तेथे ७० युक्रेनियन सैनिक ठार झाले. रशियाचे हल्ले आता लष्करी तळांपुरते सीमित न राहता नागरी भागांवरही होत आहेत. युक्रेनने म्हटले आहे की, हल्ल्यांत १४ मुलांसह ३१४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कीव्हवर ताब्यासाठी आतुर रशियन सैन्याने मंगळवारी मोठ्या तयारीसह आगेकूच सुरू केली. उपग्रह छायाचित्रांवरून दिसते की, १० हजार सैनिक आणि शेकडो तोफांचा ६४ किमी लांब ताफा कीव्हपासून २० किमीवर पोहोचला आहे. कीव्हवर कब्जा होताच युक्रेनचा पराभव होऊ शकतो.
युक्रेनवरील रशियन हल्ल्याच्या सहाव्या दिवशी कर्नाटकचा वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी नवीन शेखरप्पाचा मृत्यू झाला. नवीन अनेक विद्यार्थ्यांसोबत खार्कीव्ह शहरात अंडरग्राउंड ठिकाणी होता. मंगळवारी सकाळी गव्हर्नर हाऊससमोर अन्नाची पाकिटे वाटली जात होती. नवीन ते घ्यायला गेला तेव्हा रशियन सेनेने हल्ला केला. त्यात नवीनचा जागीच मृत्यू झाला.
रशियन लष्कर हल्ला वाढतेय, पुतीनना धोका कसा?
युक्रेनला काही तासांत भुईसपाट करू, असा पुतीन यांचा दंभ होता. मात्र, झाले असे की, रशियन चलन रुबल कोसळले. यामुळे रशियातील श्रीमंतांना दर तासाला कोट्यवधींचे नुकसान होत आहे. रशियन शेअर बाजार बंद करावे लागले. व्याज दुप्पट केले. ही प्रक्रिया आणखी काही दिवस चालल्यास लोक पुतीन यांना सहन करू शकणार नाहीत. माझ्या सूत्रांनुसार, युद्ध सोडून जाता यावे यासाठी अनेक रशियन कमांडरांना बिटकॉइनमध्ये वेतन हवे आहे.
पुतीन यांच्यासमोर आता ही आव्हाने आहेत?
पुतीन एकटे पडत आहेत. ते सरकारी प्रसारमाध्यमांच्या जोरावर रशियन जनतेची जास्त काळ दिशाभूल करू शकणार नाहीत. त्यांनी तांत्रिक दृष्टिकोनातून भलेही युक्रेनला उद्ध्वस्त केले तरी, ते हरवू शकणार नाहीत. युद्धादरम्यान कोणत्याही नाटो राष्ट्राचा नागरिक मृत्यू पावत असेल तर नाटोचे कलम-५ लागू होईल. या कलमांतर्गत नाटोला आपल्या नागरिकाच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलावे लागते.
व्हॅक्युम बॉम्ब म्हणजे फादर ऑफ ऑल बॉम्ब, त्याचा वापर ‘वॉर क्राइम’
व्हॅक्युम बॉम्बला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ म्हटले जाते. ते थर्मोबेरिक शस्त्र आहे. त्याचे तापमान एवढे प्रचंड असते की जवळ उभ्या राहिलेल्या माणसाच्या शरीराचे त्वरित वाफेत रूपांतर होते. बॉम्बमुळे ३०० मीटरच्या कक्षेतील प्रत्येक गोष्ट नष्ट होते. त्याचा वापर करणे ‘वॉर क्राइम’मानले जाते.
रशियन सैन्य नागरिकांच्या क्रूर हत्यांसाठी बदनाम झालेले आहे… चेचेन्या सर्वात मोठे उदाहरण १८६४ मध्ये रशियाने चेचेन्यावर कब्जा केला होता, पण चेचेन्याने स्वत:ला रशियाचा भाग मानले नाही. त्यानंतर रशियन सैनिक आणि चेचेन्याचे बंडखोर यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरू झाला, तो २००९ पर्यंत सुरू राहिला. पहिले युद्ध डिसेंबर १९९४ ते ऑगस्ट १९९६ पर्यंत तर दुसरे युद्ध ऑगस्ट १९९९ ते एप्रिल २००९ पर्यंत झाले. यादरम्यान रशियन सैन्याने चेचेन्याच्या बंडखोरांसह ८० हजारपेक्षा जास्त सामान्य नागरिकांची हत्या केली. ४० हजारपेक्षा जास्त लोक तर फक्त रशियाच्या छळ छावणीत मारले गेले.