विदर्भ, मध्य भारताला ‘क्लायमेट चेंज’चा धोका ; उन्हाळे लांबणार, दुष्काळ वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । विदर्भ आणि मध्य भारतातील तापमान गेल्या काही वर्षांत वाढू लागले आहे. या भागातील पर्जन्यमानातसुद्धा लक्षणीय बदल घडले. या भागातील काही जिल्ह्यांवर वातावरणीय बदलाचा विपरित परिणाम होईल, असे काही वर्षांपूर्वी जागतिक बँकेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले होते. आता आयपीसीसी अर्थात ‘इंटरगर्व्हमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज’च्याही अहवालात विदर्भ आणि मध्य भारताला वातावरणीय बदलांचा धोका वाढल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयपीसीसीच्या सहाव्या मूल्यांकन अहवालाचा दुसरा भाग अलीकडेच प्रकाशित झाला. ‘मटा’ने या अहवालाचे लेखक तथा प्रसिद्ध वातावरणतज्ज्ञ डॉ. अंजल प्रकाश यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘वातावरणीय बदलांचा परिणाम आता जगभर जाणवू लागला आहे. यात राज्यात मुंबई व समुद्र किनाऱ्याच्या प्रदेशांनाही पूरसदृश परिस्थितीत वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याखेरीज मध्य भारताचाही उल्लेख करण्यात आला आहे. विदर्भातील उन्हाळा मुळातच तुलनेने अधिक तीव्र असतो. त्यात ‘वेट बल्ब टेंपरेचर’ही वाढू लागले आहे. त्यामुळे ‌भविष्यात विदर्भ आणि मध्य भारतातील उन्हाळे अधिक तीव्र होणार असून ते लांबण्याचीही शक्यता आहे. स्वाभाविकच दुष्काळांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. या सगळ्या बाबींचा परिणाम शेती आणि अर्थव्यवस्थेवर होण्याचा धोका आहे,’ असेही डॉ. प्रकाश यांनी स्पष्ट केले.

‘वेट बल्ब टेंपरेचर’ म्हणजे उष्णता आणि आर्द्रता एकत्र करून मोजलेले तापमान होय. पाण्यात भिजविलेल्या कपड्याने तापमापी (थर्मामीटर) झाकले जाते. त्यावरून हवा सोडली जाते. सापेक्ष आर्द्रता १०० टक्के असताना ‘वेट बल्ब टेंपरेचर’ हे हवेच्या तापमानाच्या बरोबरीचे असते. कमी आर्द्रतेवर बाष्पीभवनामुळे ‘वेट बल्ब टेंपरेचर’ कमी असते. बहुतांश देशात हे तापमान २५ ते ३०च्या आसपास असते. हे ३१च्या आसपास गेल्यास ते मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यात उष्माघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसेच सलग सहा ते सात तासांकरिता ३५ अंश तापमान असणे हेसुद्धा मानवी आरोग्यासाठी घातक आहे. विदर्भ आणि मध्य भारतात पुढील काळात हे धोके वाढण्याची शक्यता या अहवालात वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *