महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले असताना, दुसरीकडे देशातील बेरोजगारीचा दरही मागील सहा महिन्यांतील उचांकीवर पोहोचला आहे. फेब्रुवारीत देशातील बेरोजगारी दर ८.१ टक्क्यांवर पोहोचला असून जानेवारीच्या तुलनेत हा बेरोजगारी दर तब्बल दीड टक्क्यांनी वाढला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीद्वारे (सीएमआयई) ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.
जानेवारीत बेरोजगारी दर १० महिन्यांच्या निच्चांकीसह ६.५७ टक्क्यांवर पोहोचला होता; परंतु आता आलेल्या अहवालानुसार ग्रामीण भागात रोजगार घटल्याने फेब्रुवारीमध्ये देशाचा बेरोजगारी दर गगनाला भिडला आहे. सीएसआयईच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२२ मध्ये ग्रामीण भागात बेरोजगारी २.५१ टक्क्यांनी वाढून ८.३५ टक्क्यांवर पोहोचली आहे; तर या उलट मागील महिन्यात शहरातील बेरोजगारी दर ७.५५ टक्क्यांवर होता. या दराने मागील चार महिन्यांतील निच्चांकी नोंदवली होती.
सीएमआयईनुसार, मागील वर्षी २०२१ च्या मे महिन्यात देशातील बेरोजगारी दर ११.८४ टक्क्यांच्या उचांकीवर पोहोचला होता. नव्या वर्षात जानेवारी २०२२ मध्ये बेरोजगारी दर जवळपास ६.५७ टक्क्यांच्या निच्चांकीवर पोहोचला. मात्र, फेब्रुवारीमध्ये पुन्हा बेरोजगारी वाढली.