ऐन गरमीत इलेक्ट्रिक उपकरणे महागणार ? लवकरच कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । फ्रीज, एसी, कूलर वा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी करायची असेल, तर ती लवकर करणे फायदेशीर ठरणार आहे. कारण, इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मितीसाठीचा खर्च वाढत असून, लवकरच कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे. येत्या महिनाभरात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालातील वाढ आणि अन्य कारणांमुळे कंपन्यांनी यापूर्वी तीनवेळा दरवाढ केली आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तांबे आणि अॅल्युमिनियचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रति टन १.६१ लाख रुपयांवर असणारा अॅल्युमिनियमचा भाव आता २.८० लाख रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी तांब्याचा भावही प्रति टन ५.९३ लाख रुपयांवरून ७.७२ लाख रुपयांवर गेला आहे. ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अॅप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष एरिक ब्रिगॅन्झा यांच्या मते गेल्या दोन वर्षांपासून कमॉडिटीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. २०१९च्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत कंपन्यांनी हळूहळू १५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता पुन्हा कच्च्या मालामध्ये वाढ झाल्याने कंपन्यांना दरवाढ केल्याशिवाय तरणोपाय नाही. कंपन्यांनी आतापर्यंत कमी मार्जिन स्वीकारले. मात्र, यापुढे तसे करणे परवडणारे नाही. त्यामुळे कंपन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत पाच ते सात टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

‘गोदरेज अॅप्लायन्सेस’चे बिझनेस हेड कमल नंदी यांच्या मते कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि उपकरणांच्या किमती यांच्यामध्ये केवळ १० टक्के अंतर राहिले आहे. त्यामुळे कंपन्या आता हे अंतर वाढविण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्लास्टिक, तांबे आणि अॅल्युमिनियमच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरातही वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या भीतीने कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे उत्पादन घटवले आहे. त्यामुळे मागणी वाढूनही पुरवठा कमीच होण्याची भीती आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत पाच ते सात टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

– सलील कपूर, प्रमुख, ओरिएंट इलेक्ट्रिक

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वाढीची कारणे

– करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीने उत्पादकांनी जानेवारीपर्यंत उत्पादनामध्ये वाढ केली नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्यानेही दरवाढ होण्याची शक्यता.

– कच्च्या तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्याने वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता. त्याशिवाय कच्च्या तेलावर अवलंबून असणाऱ्या प्लास्टिक आणि रंगाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता.

– करोनामुळे जगभर महागाईत वाढ झाली आहे. त्यातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे अॅल्युमिनियम, तांबे आणि स्टीलचे भाव विक्रमी पातळीवर गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *