महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा १०० वा कसोटी सामना आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळत कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं आहे. विराट कोहली १०० कसोटी सामने खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीची कारकीर्द आजवर अनेक चढउतारांमधून गेली आहे. भारतीय भूमीवर चांगली कामगिरी करणाऱ्या विराटने इंग्लंड दौऱ्यावर संघर्ष केला, पण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत जबरदस्त धावा केल्या. यानंतर त्याने फलंदाजीतील तंत्र बदलत इंग्लंडमध्ये चांगल्या धावा केल्या. आता पुन्हा एकदा विराट मोठी इनिंग खेळण्यासाठी संघर्ष करत आहे. १०० व्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीचा टेस्ट कॅप देत सन्मान करण्यात आला. यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“राहुल भाई, माझ्यासाठी हा एक खास क्षण आहे. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि तुमच्याशिवाय हा प्रवास शक्यच नसता. बीसीसीआयचेही आभार. मला हा सन्मान एका चांगल्या व्यक्तीकडून मिळाला. माझा बालपणीचा राहुल द्रविड हिरो आहे. मी अंडर १५ क्रिकेट संघात असल्यापासून एक फोटो माझ्याकडे अजूनही आहे. माझ्या कुटुंबियांचेही आभार मानतो. आजचा सामना पाहण्यासाठी माझी पत्नी इथे माझ्यासोबत आहे, माझा भाऊ प्रेक्षक गॅलरीत आहे. ” विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ पासून एकही शतक झळकावलेलं नाही. असं असूनही त्याने ४० च्या सरासरीने धावसंख्या केली आहे.
#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022
वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या २५ सामन्यांमध्ये ४३ डाव खेळले आणि ४४.३५ च्या सरासरीने १७३० धावा केल्या. त्याच्या कारकिर्दीतील दुसऱ्या टप्प्यातील २५ सामन्यांमध्ये विराटने हे सिद्ध केले की, फलंदाजीसाठी तयार झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ४३ डावांत ५१.४५ च्या सरासरीने २१६१ धावा केल्या. यादरम्यान त्याने कसोटीत आठ शतके आणि चार अर्धशतके झळकावली. या दरम्यान कसोटी संघाची कमानही त्याच्या हाती आली होती. तेव्हापासून त्याच्या कसोटी कारकिर्दीचा सुवर्णकाळ सुरू झाला. आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या २५ सामन्यांमध्ये विराटची बॅट चांगलीच तळपली. विराटच्या नेतृत्वाखालील संघाने परदेशात जाऊन सामने जिंकून अनेक विक्रम केले. विराटने ४२ डावांमध्ये ६७.१० च्या सरासरीने २६१७ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटने ११ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली. यादरम्यान त्याने ६४ टक्के अर्धशतकांचे शतकांमध्ये रूपांतर झाले.
क्रिकेटवर राज्य केल्यानंतर विराट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याने एकही शतक झळकावलेले नाही. यादरम्यान त्याची सरासरीही घसरली असून भारतीय संघाचे तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपदही त्याच्या हातून गेले आहे. विराटने आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या २४ सामन्यांमध्ये ४० डाव खेळले असून ३८.२६ च्या सरासरीने १४५४ धावा केल्या आहेत. यावेळी केवळ दोनच शतके झळकली आहेत. त्याचबरोबर त्याने नऊ वेळा अर्धशतकी खेळी खेळली आहे.