महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांचा संप अद्यापही सुरू असला तरी एसटीचे विलीनीकरण करणे शक्य नाही. कर्मचारी संघटनांची ही मागणी मान्य करू नये अशी शिफारस मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केली आहे. समितीचा हा अहवाल आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवल्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱयांना 10 मार्चपर्यंत कामावर या, असे आवाहन केले. एसटी कर्मचाऱयांनी दिलेल्या मुदतीत कामावर रुजू व्हावे अन्यथा कंत्राटी पद्धतीने भरती करावी लागेल, असेही परब यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
महामंडळाच्या कर्मचाऱयांना राज्य सरकारी कर्मचारी समजण्यात यावे या मागणीचा विचार करण्याकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या समितीने आपला अहवाल दिला. हा अहवाल आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला.