महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । शेताच्या बांधावर चौफेर मक्याची लागवड अन् आतमध्ये साडेतीन एकरावर प्रतिबंधित असलेल्या अफूची लागवड करून अजब शेती करण्याचा प्रकार चोपडा तालुक्यात उघडकीस आला आहे. आठ दिवसांत अफूचे पीक हातात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी ही शेती उद्ध्वस्त केली असून संशयित आरोपीस अटक करण्यात आली. दरम्यान, इंटरनेटवरून माहिती घेत शेती केल्याचे तपासात पुढे आले आहे.
अफू (खसखस) लागवडीस महाराष्ट्रात परवानगी नाही. असे असतानाही वाळकी (ता. चाेपडा) येथील प्रकाश सुधाकर पाटील (४०) या शेतकऱ्याने त्यांच्या स्वत:च्या दीड एकर शेतात व घोडगाव येथील भागवत पितांबर पाटील यांच्या दोन एकर भाड्याने घेतलेल्या अशा एकूण साडेतीन एकरात चोपडा येथून ३० किमी अंतरावर बुधगाव रोडवर घोडगाव शिवारात अफूची लागवड केली. कुणाच्याही निदर्शनास येऊ नये, म्हणून अफूच्या आजूबाजूला मक्याची लागवड केली आणि आतमध्ये अफू पिकवली. संपूर्ण अफूचे पीक उपटून ताब्यात घेण्यासाठी दोन दिवस लागणार
पोलिसांचा रात्री शेतात मुक्काम
पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ३ मार्चला रात्री ९.३० वाजता शेत गाठले. पोलिस व होमगार्ड यांनी शेतात रात्री मुक्काम करून संपूर्ण शेतीची पाहणी केली. ४ मार्च रोजी पहाटे शेतकरी प्रकाश पाटीलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर संपूर्ण पीक उपटून ताब्यात घेण्यात येत आहे. प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंटरनेटवरून माहिती घेत लागवड
कमी दिवसांत जास्त पैसे मिळतात या लालसेपोटी पाटील यांनी अफूची लागवड केली. त्यापूर्वी इंटरनेटवर या शेतीची माहिती घेतल्याचे प्रकाश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्याने कुणाकडून बियाणे आणले, तो कोणाला विक्री करणार होता, अधिक माहितीसाठी पोलिस तपास करीत आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई : अफूचे पीक काढण्यापर्यंत कुणालाही त्याची कानोकान खबर नव्हती. मात्र, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चोपडा ग्रामीण पोलिसांनी शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांना अफूचे पीक आढळून आले.