महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । राज्यात काही ठिकाणी उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. मात्र, उन्हाळ्याच्या तोंडावरच काही भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हवामान ढगाळ राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. येत्या चार दिवसात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. काही ठिकाणी वादळी वारे देखील वाहू लागल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वातावरणात अचानक बदल झाला असून येत्या तीन ते चार तासांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार (Maharashtra Rain Alert) आहे. सध्या रब्बीचा हंगाम काढणीला आहे. या हंगामाच्या सुरुवातीलाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस झाला होता. यंदा डिसेंबर महिन्यातही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या. काही ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकांची काढणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी आणि पिकं सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावी, असं आवाहन शेतकऱ्यांनी केलंंय.
या जिल्ह्यांना अलर्ट –
राज्यातील नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये येत्या तीन ते चार तासांत सोसाट्याचा वारा, वादळ, विजांचा कडकडाट आणि जोरदार मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याशिवाय ७ व ८ मार्च रोजी आकाश ढगाळ राहणार आहे. तर, ८ मार्चला औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.